नंदी नसलेले कपालेश्वर मंदिर .........
नाशिकची धार्मिक ओळख मानल्या जाणाऱ्या रामकुंडापाठोपाठ श्री कपालेश्वराचं नाव घेतलं जातं. श्रीविष्णुंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने, श्री कपालेश्वर दर्शनातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. विशेष म्हणजे, नंदी नसलेलं महादेवाचं देशभरातलं एकमेव मंदिर असावं. श्रावण महिन्यात कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते.
नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात नंदी का नाही याचीही पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व शंकर यांमधे वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते.
एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोर्हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोर्हा म्हणाला की, 'मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार'. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, 'तू हे जर केलेस तर तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजेच ब्रह्महत्येचे पातक लागेल'. त्यावर तो नंदी म्हणाला, 'मला त्यावरचा उपाय माहीत आहे.' दुसर्या दिवशी ब्राह्मण गोर्ह्यास वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागला. त्यानंतर त्या नदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर 'तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस तू माझ्या गुरुसमान आहेस' असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचे महत्त्व आहे, असे सांगितले जाते.हे मंदिर टेकडीवर आहे. आता आजूबाजूला वस्ती झाली आहे.
कपालेश्वर शिवलिंग हे अतीप्राचीन
आहे. त्याचा शोध इ.स. ११०० च्या सुमारास लागला असल्याचे सांगतात. काही लोकांना
रामकुंडानजिक असलेल्या टेकडीवर एक भुयार दिसले. त्या भुयारात शिवलिंग असल्याचे
त्यांनी पाहिले. त्या वेळी त्यांनी तेथील ब्राह्मणांशी चर्चा करून समुपदेशन घेतले
आणि नंतर येथे कपालेश्वर मंदिर असल्याची घोषणा केली. तेव्हापासून तेथे पूजा-अर्चा
चालू झाली. अरुणा-गोदावरी नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर यवनांनी नष्ट केले
होते.
कालांतराने येथील पाटलांनी गवळी राजा
यास मंदिर बांधण्यास सांगितले. वर्ष १६५५ मध्ये कोळी राजाने त्या काळचे सहस्रावधी
रुपये खर्चून मंदिर बांधले आणि तेथे गुरवांची नेमणूक केली. त्यानंतर कृष्णाजी पोवार-पाटील
यांनी २७५ रुपये व्यय करून पायर्या बांधल्या. जगजीवनराव पोवार यांनी वर्ष १७६३
मध्ये १० सहस्र रुपये व्यय करून मंदिराचा पुढील भाग बांधला.
भगवान शिवाची नित्य पूजा-अर्चा केली जाते. प्रत्येक सोमवारी श्री कपालेश्वराच्या
रौप्यमुकुटाचे महास्नान होऊन तेथे संकल्पासहित षोडशोपचारे पूजन केले जाते. कार्तिक
मासात श्री कपालेश्वरांचे हरिहर, अर्धनारी नटेश्वर,
ब्रह्मरूप असे वेगवेगळे ध्यान सजवले जाते. प्रत्येक श्रावणी सोमवार,
वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि
शिवरात्र या दिवशी देवाचा उत्सव साजरा होतो. श्री कपालेश्वर मंदिरात गुरव आणि
ब्रह्मवृदांना पूजेचा सामायिक अधिकार आहे. श्री कपालेश्वर हे अत्यंत जागृत
देवस्थान आहे.
Comments
Post a Comment